मशाल हातात घेतलेली स्त्री
एका घराच्या वेदनेतून उभं राहिलेलं बारामतीचं बळ
दादा लोकनेते होते. पण त्याचबरोबर ते एक पती आणि पिता देखील होते.
नवरा गेल्यावर बायकोचं काय होतं, हे मी वडील गेल्यावर आईकडे पाहून अनुभवलं आहे.
सगळं जग पायाशी असलं तरी नजर जोडीदारालाच शोधत राहते.
वाहिनीसाहेबांचे अश्रू बघवत नाहीत.
पण अशा वेळी स्त्री किती जिवंत आणि जागी असते, याची प्रचिती त्यांनी दिली.
धाकल्याचा धाक, धन्याचा दरबार — एक क्षणही पडू दिला नाही.
लोक येतच होते. आणि येतच राहणार.
बारामती पोरकी झाली असेल… पण आता त्या बारामतीची माय-बाप म्हणून उभ्या आहेत.
परिस्थितीने शक्ती दिली असेल, पण ती पेलवण्याची ताकद मात्र त्यांची स्वतःची आहे.
माननीय सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्या. मोठी कसोटी पार पडली.
लोक काय म्हणतील यापेक्षा जबाबदारीचं पलांडं जड होतं. भावना जड होत्याच.
त्या दिवशी त्यांनी हृदयावर दगड ठेवून पाऊल टाकलं असेल — राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून.
ना आतिषबाजी. ना तोंडं गोड.
फक्त डोळ्यात अश्रू… आणि उरात कर्तृत्व.
फक्त जबाबदारी. आणि जबाबदारी.
दादांसारखी धगधगती आग कधी शांत होत नाही. ते शरीर नव्हतं — तो विचार आहे. ती एक ज्योत आहे.
कधी जिजाऊंच्या हातात, कधी अहिल्याबाईंच्या. कधी ताराराणींनी जिवंत ठेवलेली, कधी सावित्रीबाईंनी ज्ञानात रुपांतर केलेली.
ती महाराष्ट्राच्या मशालीची ज्योत आहे.
आणि आज ती मशाल त्यांच्या हाती आहे — याचा अभिमान आहे.
भावना आवरता येत नाहीत कधी. पण बारामती प्रमाणे आपणही थांबून चालणार नाही.
दादांनी दिलेली संपत्ती जपायचीच. पण त्यात भरही टाकायची.
त्यांनी वाट दाखवली आहे.
चला — आपण किमान खारीचा वाटा तरी देऊया.
आमच्या कोल्हापूरला दहावा-बारावा असला की दुखवटा काढायला जिलेबी घेऊन जातात.
बारामतीची तशी रीत नाही… म्हणून हे दोन शब्द गोड मानून घ्या. 🙏
सत्यजित साळोखे


