वाघळवाडीच्या माळरानावर “बांधारीचे बाय गं”
“एक काळ होता जेव्हा आपण असे होतो, आणि एक काळ होता जेव्हा माणसं अशी जगायची” — असं आईबाप आणि आजी-आजोबांच्या तोंडून आपण खूप वेळा ऐकलं आहे. पण “तो एक काळ होता” असं म्हणायची वेळ तरुण पिढीवर इतक्या लवकर येईल, असं वाटलं नव्हतं. “बांधारीचे बाय गं” पाहिलं नसतं तर यावर कधी विचारही केला नसता.
आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये रीत-भात, जीवनशैली या पिढ्यान्-पिढ्या बदलत जायच्या. आता मात्र एकाच पिढीत सातत्याने बदल अनुभवायला मिळत आहेत. याचे पडसाद गावाकडे जास्त जाणवतात, कारण आधुनिकीकरणामुळे ती शहरांच्या जवळ येत चालली आहेत. जंगलातले प्राणी गावात, आणि बांधावरचा माणूस औद्योगिक संकुलात अधिक दिसू लागला आहे.
याच बदलांची, आठवणींची, आणि रुचिकाजींनी पाहिलेल्या पन्हाळ्याची व कोल्हापूरची कहाणी “बांधारीचे बाय गं” मध्ये अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहे. ज्या बांधारीत हे नाट्य रचलं गेलं आहे, तिथेच माझाही एक बांध आहे — रुचिकाच्या खोतांच्या बांधाला लागून. समोर कोपकरांचा वावर होता, आणि मध्ये एक छोटंसं घर. ते घर आता सिमेंटचं मोठं झालंय. घराशेजारून वाहणारा झरा सपाट झालाय. जनावरं आणि त्यांचा गोठा गायब झालाय. बदल बदल न राहता आता फक्त विध्वंस उरला आहे. बदल घडतो तेव्हा काहीतरी शमतं, आणि त्यातून काहीतरी नवीन निर्माण होतं; पण आता फक्त नष्टच होत चाललं आहे सगळं. तरीही तो गावरान गोडवा, मैत्रीतला ओलावा — बांधारीच्या बाईने जतन करून ठेवला आहे.
मागे शेतावर गेलो होतो तेव्हा कोपकर पळत-पळत आले. म्हणाले, “डेव्हलपमेंट करा. बुलडोझर चालवा आणि एखादा स्विमिंग टँक करा.” जी जमीन बाप-जाद्यांनी बोटांनी नांगरली, जिथे एकेकाळी मालवणींच्या, धनगरांच्या ओव्या सांडल्या — त्या सोन्याच्या मातीत असलं हिडीस काहीतरी करायचं धाडस होत नाही. पन्हाळ्याला इतिहास आहे, संस्कृती आहे आणि निसर्गाने बहाल केलेली बांधारी आहे. ती जतन करण्याची वेळ आली आहे; पण ही बांधारी आपलं जगणं सहज जगू शकत नाही, याची खंत आहे.
“बांधरींचे बाय गं” अनेक अंगांनी रुचिका खोत यांचं आत्मचरित्रच वाटतं. मला भिजकीवही आठवली, आणि रुचिका खोत यांचा अभिनय पाहून लोक आनंदाने रडले. कारण “बांधारीचे बाय गं” हे अनवाणी चालणाऱ्या प्रत्येक माणसाला आपलं वाटणारं कथानक आहे. या नाटकातील प्रमुख पात्राला नाव नाही — कारण आपण सगळेच ते पात्र आहोत, आणि त्यातली बांधारी म्हणजे आपल्या भिजलेल्या, उपेक्षित आयुष्याचं प्रतीक आहे.
परेशजी आणि समीक्षाजींमुळे असे प्रयोग पाहायला मिळतात — त्यासाठी मनापासून आभार.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलेला मित्रपरिवार.
समीक्षा, हनुमंत चांदगुडे, सुवर्णरेहा जाधव, डॉ उर्जिता कुलकर्णी, प्रफुल पाठक – दिल्ली, परेश.
शंकर जाधव, Bombay Stock Exchange







