लावणी समजून घेताना: कला, अदाकारी आणि तुळशीकट्ट्याची जादू
शास्त्रीय कलांचा रस, आणि लोककलेचा बाज. हास्य आणि त्याला शृंगाराचा साज. ४१व्या तुळशीकट्ट्याला काल मुंबईहून भूषण कोरगावकर आणि नृत्यांगना गौरी जाधव आणि अक्षय मालवणकर “लावणी समजून घेताना” हा लावण्याच्या आणि लावणी कलावंतांच्या विश्वाची ओळख करून देणारा कार्यक्रम घेऊन आले होते. मला या आगळ्या-वेगळ्या लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला याचं फार आनंद आहे. फडामध्ये किंवा कला केंद्रात लावणी बघण्यापेक्षा हा अनुभव निराळा होता. या प्रोग्रॅममध्ये लावणी एक कला प्रकार म्हणून समजून घेता येतोच, पण त्याचबरोबर लावणीत सहभागी पण होता आलं. असा immersive experience फक्त तुळशीकट्ट्यावरच घेता येतो, हे विशेष. परेशजी आणि समीक्षाजी खूप आपुलकीने बोलावतात, आगत्यातिथ्य करतात आणि असे दुर्मिळ अनुभव घेण्याची संधी देतात. कौतुक करावे तेवढे कमीच.
कार्यक्रमामध्ये बऱ्याच बाबींवर चर्चा झाली. तमाशा कलावंतांमध्ये असलेली मातृसत्ताक संस्कृती आणि त्याचे प्रस्थापित पितृसत्ताक समाजावर होणारे परिणाम आणि प्रतिक्रिया. कला आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी नेहमी शोषित समूहांच्या खांद्यांवर देण्यात आली आहे, मग ते पोतराज असोत वा जोगतीण. डौलात ज्यादा म्हणजे काय वगैरे. अर्थात या चर्चेचा बराच भाग हा मूळ कार्यक्रमाबरोबर तुळशीकट्ट्याचाही होता.
लावणी नृत्यामध्ये तुळशीकट्ट्याच्या उत्साही प्रेक्षकांनी भाग घेतलाच, पण विशेष म्हणजे नौशाद यांनी खूप छान बैठी लावणी सादर केली. गौरीजींनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. अक्षयजींनी “नेसले पितांबर” ही त्यांच्या गुरु शकुंतला नगरकर यांची लावणी पहिल्यांदाच सादर केली आणि ती खूप भावली.
अदाकारी, नृत्य, व्यंग, हास्य अशा अनेक पैलूंनी लावणीचा साज नटला आहे, आणि त्यांना साथ आहे ती पितळी तारेत ओवलेल्या घुंगरांची. १३व्या शतकाच्या आधीपासून लावण्या उपशास्त्रीय अंग धरून लोककलेच्या मंचावर वाहत आहेत. आणि तिचं लोकार्पित, श्रुताउन्मुक्त आणि पारंपरिक रूप जतन करण्याचं काम भूषणजी करत आहेत. कारण लावणी हे फक्त प्रेम, शृंगार व्यक्त करण्याचं साधन नाही आहे. त्यातून सामाजिक समस्या, रोजमर्राच्या गोष्टींमधली मजा आणि जनजागृती असे बरेच कार्य घडत असतात. मनोरंजन विचारधारा विकसित करण्याचा मार्ग झाला की विषय खोल पोहोचतो. लावणीकलावंतांचं खरं सौंदर्य हे त्यांच्या अदाकारीमध्ये दडलेलं असतं. आणि पिकलं पान पिकलं तसं अजूनच बहरत जातं. कारण त्यांची अदा कसत जाते आणि अजून गोड होत जाते. हे सगळं new media च्या चौकटीमध्ये बसणारं नाही, आणि ते त्यात टाकलं तर लावणी लावणी राहत नाही. ते फडांवर बघा आणि कट्ट्यांवर अनुभवा.
तुम्हाला कधी संधी मिळाली तर त्यांचा हा लावणीवरचा कार्यक्रम नक्की बघा.
सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१
बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन.



